Stock Markets : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाचे काळे ढग आता जागतिक बाजारासह भारतीय शेअर बाजारावरही दाटून आले आहेत. मार्च महिन्यात भारतीय बाजाराने मोठी पडझड अनुभवली असून प्रमुख निर्देशांक तब्बल १० टक्क्यांनी कोसळले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीने एकापाठोपाठ एक आपले महत्त्वाचे आधार स्तर तोडल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः किरकोळ गुंतवणूकदार या महाघसरणीमुळे हतबल झाले आहेत.
बाजारात विक्रीचा दबाव
शुक्रवारी दुपारी बाजारात विक्रीचा प्रचंड दबाव दिसून आला. दुपारी २:३० वाजेच्या सुमारास निफ्टी ४३३ अंकांनी (१.८१%) घसरून २३,२११ वर व्यापार करत होता, तर सेन्सेक्स १२७० अंकांनी (१.६६%) कोसळून ७४,७५१ च्या स्तरावर आला होता. बाजारातील घसरणीचा अंदाज यावरून लावता येतो की, तब्बल ३,०३८ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते, तर केवळ ७६६ शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
'सावधान' राहण्याचा इशारा
सॅमको सिक्युरिटीजचे डेरिव्हेटिव्ह रिसर्च ॲनालिस्ट धुपेश धमेजा यांच्या मते, "निफ्टी सध्या आपल्या १०-DEMA च्या खाली व्यवहार करत असून मोमेंटम इंडिकेटर्स कमकुवत आहेत. RSI ४० च्या खाली गेल्याने बाजार 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये आला आहे. मात्र, 'इंडिया VIX' २० च्या वर असणे हे बाजारात मोठ्या अस्थिरतेचे संकेत आहेत."
शॉर्ट टर्म चिंता: जोपर्यंत निफ्टी पुन्हा २३,८०० - २४,००० ची पातळी ओलांडत नाही, तोपर्यंत प्रत्येक वाढीकडे 'विक्रीची संधी' म्हणून पाहिले जावे.
शिस्तबद्ध गुंतवणूक : चॉइस इक्विटी ब्रोकिंगचे हितेश टेलर यांनी सल्ला दिला आहे की, गुंतवणूकदारांनी आता निवडक राहण्याची गरज आहे. जेव्हा निफ्टी २५,००० च्या वर टिकेल, तेव्हाच नवीन 'लॉन्ग पोझिशन' घेणे सुरक्षित ठरेल.
घसरणीची प्रमुख कारणे
- पश्चिम आशियातील युद्धाचा वणवा पेटल्याने जागतिक अनिश्चितता वाढली आहे.
- ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल १०० डॉलरवर पोहोचल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला आहे.
- परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सातत्याने पैसे काढून घेत आहेत. ब्लूचिप आणि लार्जकॅप शेअर्सवरही विक्रीचा मोठा दबाव आहे.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
जिओजित इन्व्हेस्टमेंटचे व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, "हा काळ गुंतवणूकदारांसाठी आव्हानात्मक आहे. अशा वेळी शांत राहून आपल्या गुंतवणुकीचा आढावा घेणे गरजेचे आहे. बाजारात रिकव्हरी येण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे घाईघाईत निर्णय न घेता एसआयपीद्वारे गुंतवणूक सुरू ठेवणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे."
वाचा - तुमच्या हक्काचं रेशन किती? आता दुकानदाराला विचारण्याची गरज नाही; मोबाईलवरच मिळणार हिशोब!
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
